Saturday, October 3, 2015

पितर पुजन

‘जातस्य हि ध्रुवो मृत्यु:’ या भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेल्या सत्यवचनाप्रमाणे जन्मलेल्या प्राण्याला मृत्यू अटळ आहे. मृत्यू हा कुणालाही सोडत नाही. मग तो राजा असो की नोकर असो, पापी असो की पुण्यवान असो, वृद्ध असो की बालक असो, रोगी असो वा निरोगी असो, मंत्री असो वा साधू असो. समर्थ रामदास स्वामी दासबोधात खूप छान सांगतात-
मृत्यू न म्हणे हा संत | मृत्यू न म्हणे हा महंत|
मृत्यू न म्हणे हा गुप्त| होत असे ॥ दासबोध ॥
मृत्यू न म्हणे हा शास्त्रज्ञ| मृत्यू न म्हणे वेदज्ञ|
मृत्यू न म्हणे सर्वश्र| सर्व जाणे ॥ दासबोध ॥
जीवनाची समाप्ती ही मृत्यूनेच होते. सृष्टीनिर्माता परमात्मा आपला अंश कर्माची शेष (पुंजी) घेऊन जीवरूपात देहरूपाने येतो व कर्म करून शेवटी पाप-पुण्याच्या कर्मबंधनात राहून वासनेच्या आधारे जीवन जगून स्थूल देह सोडून जातो. जीव जे शरीर धारण करतो ते चार भागांत असतं. स्थूल, सूक्ष्म, करण व महाकरण. स्थूल शरीर म्हणजे जे डोळ्यांनी दिसते ते शरीर. सूक्ष्म शरीर वायुरूपात असते ते दिसत नाही. मृत्यूच्या वेळी जीवात्मा स्थूल देह सोडून देतो व अङ्‌गुष्ठाएवढे अतिवाहिक सूक्ष्म शरीर धारण करून याम्यमार्गाने यमराजकडे पोहचतो असे स्कंदपुराणात व गरुडपुराणात सांगितले आहे. पंचमहाभूतात्मक नरदेह प्रेतरूपाने जो असतो त्याचे विधिवत् क्रियाकर्म आपल्या शास्त्रात सांगितले आहे ते और्ध्वदैहिक संस्कार, पिण्डदान, तर्पण, श्राद्ध इत्यादी नावांनी संबोधल्या जाते.
सामन्यत: या जगात पाप-पुण्य दोन्हीही करत असतो. पुण्याचे फळ स्वर्ग तर पापाचे फळ नरक आहे हे सर्वश्रुत आहे. स्वर्ग नरकादी भोग संपल्यानंतर आपापल्या कर्मानुसार ८४ लाख योनींतून भटकल्यानंतर परत मनुष्याचा जन्म मिळतो म्हणजे हे जन्म-मृत्यूचे चक्र चालूच असते. पुण्यात्माला मनुष्ययोनी किंवा देवयोनी मिळते, तर पापात्म्याला पशु-पक्षी, कीटकांची योनी मिळते म्हणून आपल्या शास्त्रानुसार पुत्र-पौत्रांचे कर्तव्य असते की त्यांनी आपल्या आई-वडिलांचे व पूर्वजांचे श्राद्धकर्म प्रामाणिकपणे करायला हवे ज्यामुळे पूर्वजांना परलोकात सुख प्राप्त होते. भारतीय संस्कृती तथा सनातन धर्मात पितृ ऋणातून मुक्ती मिळण्यासाठी परिवाराच्या मृत व्यक्तींचे यथाशक्ती श्राद्धकर्म करण्याची सूचना देतात.
ऋणमुक्ती हे भारतीय संस्कार आहेत. कोणी क्षणिक छोटीशी जरी मदत केल्यास आपण धन्यवाद म्हणून काही अशी ऋणातून मुक्ततेचा स्वाद अनुभवतो. आपल्यावर कितीतरी कर्ज असते. मातृऋण, पितृऋण, ऋषीऋण, समाजऋण वगैरे. या सर्व ऋणांची जाणीव असणे म्हणजे व्यक्तीच्या प्रगतीचे लक्षण होय. आपली ओळख आपल्या माता-पित्यामुळेच आहे याची जाणीव असणे गरजेचे असते. ते नसते तर मी राहिलोच नसतो. त्यांनी लहाण्याचे मोठे केले, शिकवले, स्वत:च्या पायावर उभे केले. किती कष्ट त्यांनी घेतले असतील आपल्याला मोठं करण्यात? याचे भान असणे गरजेचे. पुत्र या शब्दाचा अर्थ ‘पुन्नाम नरकात् त्रायते इति पुत्र’ म्हणजे नरकापासून जो रक्षण करतो तो पुत्र. नरकात ढकलतो तो ‘कुपुत्र’ होय. कुपुत्राला महा नरकयातना पुराणात सांगितल्या आहेत, म्हणून पुत्र कुपुत्र न होवो त्यासाठी त्याने पितृकार्य श्रद्धेने केले पाहिजे. हे कार्य देवकार्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, असे आमची श्रुती सांगते-
देवकार्यादपि सदा पितृकार्य विशिष्यते|
देवताभ्यो हि पूर्वं पितृणामाप्यायनं वरम् ॥
देवपूजेपेक्षा पितृकार्याचे विशेष महत्त्व आहे म्हणून देवकार्याच्या पूर्वी आपल्या पितरांना तृप्त करायला पाहिजे. त्यांचे विधिवत् श्राद्ध करायला पाहिजे. पितरांच्या उद्देशाने जे कर्म करता त्याला ‘श्राद्ध’ म्हणतात. ‘श्रद्धया कियते तत् श्राद्धम्’, अशी सोपी व्याख्या श्राद्धाची आहे. श्राद्धाचे महत्त्व तसे आहे-
श्राद्धात् परतरं नास्ति नान्यच्छ्रेयस्कर मुदाहृतम्|
तस्मात् सर्वप्रयत्नेन श्राद्धं कुर्याद् विचक्षण: ॥ हेमाद्रि ॥
श्राद्धापेक्षा कल्याणकारी पवित्र दुसरे कर्म नाही आहे, म्हणून जाणत्यांनी प्रयत्नपूर्वक श्रद्धेने असे पवित्र कार्य करायला पाहिजे. जो शांत मनाने श्रद्धेने श्राद्धकर्म करतो, तो सर्व पापांतून मुक्त होतो. त्याला पितरांचे आशीर्वाद मिळतात. जन्म-मृत्यूच्या चक्रातूनसुद्धा सुटका म्हणजे ‘मोक्ष’ मिळतो असे म्हणतात. प्रभू रामचंद्राने आपल्या पित्याचे- राजा दशरथाचे राजस्थान येथे पुष्करला श्राद्ध केले होते.
भाद्रपद पितृपक्ष हा पितरांचा पक्ष आहे. या पक्षात आपले पूर्वज त्या त्या तिथीला वायुरूपात आपापल्या पुत्र-पौत्राकडे मोठ्या आशेने पिंड, तीळ, जल, स्वीकारण्यासाठी येतात. जिथे त्यांना श्रद्धेने पिंड, जल प्राप्त होताच तिथे ते आशीर्वाद देतात. परंतु जिथे त्यांना हे काहीच मिळत नाही, तिथे पितरांचा शाप मिळतो. ब्रह्मपुराणात सांगितले आहे की-
‘श्राद्धं न कुरुते मोहात् तस्य रक्तं पिबन्ति ते|’
पितरस्य शापं दत्त्वा प्रयान्ति च ॥
श्राद्ध न करणार्‍यांना पितर शाप देऊन त्यांचे रक्त पितात. त्या परिवाराला महान कष्ट सहन करावे लागते, म्हणून यातून मुक्तीसाठी पितृपक्षात तिथीला किंवा अमावास्येला म्हणजे ‘सर्वपितृमोक्ष अमावस्येला’ ब्राह्मण भोजन करून श्राद्धाचे फल प्राप्त होते. मनुस्मृतीमध्ये सांगितले आहे की, श्राद्धाला निमंत्रित ब्राह्मणांमध्ये पितर वायुरूपाने गुप्त येतात व ते ब्राह्मणांसोबत भोजन करतात. पितर सूक्ष्म शरीरधारी असल्याने जल, अग्नी वायुप्रदान असतात व ब्राह्मणांसोबत वायुरूपात भोजन करून तृप्त होतात. जे निर्धन असतात किंवा अत्यंत गरीब असून ब्राह्मणभोजन करण्याचे सामर्थ्य नसेल त्यांच्यासाठी शास्त्रात प्रयोजन आहे. अशा लोकांनी भाजी विकत घेऊन ब्राह्मणांना श्रद्धेने अर्पण करून संकल्प करावा. ज्यांच्याकडे भाजी विकत घ्यायला पैसे नसतील त्यांनी गायीला गवत खाऊ घालावे त्यामुळेसुद्धा श्राद्धाचे पुण्य लाभते. परंतु सामर्थ्यवान् लोकांनी श्राद्धकर्मात कंजुषी करू नये, असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
श्राद्धकर्माचा खरा अधिकार पुत्राला आहे. ज्येष्ठ पुत्राला प्रथम अधिकार आहे. तो नसेल तर कनिष्ठ पुत्र श्राद्धकर्म करू शकतो. पुत्र नसेल तर हेमाद्री ग्रंथानुसार पत्नीला अधिकार आहे. पत्नी नसेल तर सख्ख्या भावाला श्राद्धकर्म करता येतं. श्राद्धाचे एकूण पाच प्रकार सांगितले आहे. नित्य, नैमित्तिक, काम्य, वृद्धी व पार्वण श्राद्ध. दररोज जे श्राद्ध होते त्याला नित्यश्राद्ध म्हणतात. यात विश्‍वदेव होत नाही, केवळ जलप्रदानानेही श्राद्धाची पूर्ती सांगितली आहे. एकोदिष्ट श्राद्ध म्हणजे नैमित्तिक श्राद्ध होय. जे एक उद्दिष्ट ठेवून केल्या जाते. विशिष्ट कामनेच्या पूर्तीसाठी केलेल्या श्राद्धाला काम्यश्राद्ध म्हणतात. मंगलादी कार्यात जे श्राद्ध होते त्याला वृद्धीश्राद्ध किंवा ‘नांदीश्राद्ध’ असे म्हणतात. तसेच पितृपक्ष अमावास्या किंवा विशेष पर्वावर (तिथीवर) जे श्राद्ध केल्या जाते, त्याला पार्वण श्राद्ध असे म्हणतात. परंतु मृत्युतिथी किंवा पितृपक्षात श्राद्ध अवश्य करावे, असे शास्त्र सांगते.
अशा प्रकारे अधिकारीयुक्त व्यक्तीने श्राद्धकर्म योग्य वेळी पांढरे वस्त्र परिधान करून दक्षिणेला तोंड करून संकल्प करावा. श्राद्धादी कर्मासाठी अपरान्ह काळ म्हणजे दुपारची वेळ योग्य आहे. सकाळी किंवा सायंकाळी पितृकार्य करू नये. शक्यतोपरी चांदीचे पात्र उत्तम असे सांगितले आहे. ते शक्य नसल्यास मातीचे भांडे योग्य आहेत. पिंड हा हातात किंवा पात्रात द्यायचा नसतो तर तो कुशावर ठेवायचा असतो. अशा प्रकारे श्रद्धेने श्राद्धकर्म करणार्‍या जाचकाला पितरांचे व देवांचे आशीर्वाद मिळून तो मोक्षाचा अधिकारी होतो.
परंतु महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जिवंतपणी आई-वडिलांना कष्ट देऊन नंतर त्यांच्या परलोकगमनानंतर पितृकार्य अविवेकी ठरते. जिवंतपणी स्वत:च्या सुखासाठी त्या जन्मदात्यांना वृद्धाश्रमात ठेवणे व नंतर श्राद्धादी कर्मे करणे हे अविवेकी कृत्य जाचकांनी समजून घ्यायला पाहिजे. ज्यांच्यामुळे आपल्याला समाज ओळखतो, ज्यांच्यामुळे आपण स्वत:च्या पायावर उभे राहून भोग भोगत असतो, त्या जन्मदात्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणे किती लज्जास्पद आहे. यावर आत्मचिंतन करायला पाहिजे. वास्तविक पाहता वृद्धाश्रमांचे अस्तित्वच सामजाला मोठा कलंक आहे. तेव्हा विवेकाचे, कृतज्ञतेचे भान ठेवून जन्मदात्या आई-वडिलांची जिवंतपणी सेवा व त्यांचे श्राद्धकर्म ही खरी ईश्‍वर पूजा आहे. म्हणूनच श्रुतिवचन सांगते की, पितृकार्य हे देवकार्यापेक्षा श्रेष्ठ असते.

ज्योतिष्याचार्य
डॉ.सुहास रोकडे
www.astrotechlab.weebly.com
Only email plz.
(Original article of Naresh Pande)

No comments:

Featured Post

Read Google books-Astrologer Dr.Suhas

www.astrotechlab.weeebly.com >