Saturday, October 10, 2015

जगतजननी दशमहाविद्या - डॉ.सुहास रोकडे

देवी कालिका, तारा, भुवनेश्‍वरी, भैरवी...
तन्त्रोक्त दशमहाविद्या

देवी कालिका, तारा, भुवनेश्‍वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धूमावती, बगलामुखी, मातंगी व कमला या तन्त्रोक्त दशमहाविद्या होत. महाभारत पुराण, चामुंडातंत्र आदी ग्रंथांमध्ये या सर्व देवींचा उल्लेख आहे व त्यांच्याविषयी कथा विभिन्न ग्रंथांत विभिन्न प्रकारे वाचावयास मिळतात. यातील सर्वाधिक प्रसिद्ध कथा आहे महादेव व सती यांची. ही सर्वश्रुत कथा इथे काहीशी निराळी आहे.
एकदा देवाधिदेव महादेव महाशक्तीची आराधना करीत होते. त्यावेळी त्यांना महामायेचा स्त्रीरूपात लाभ होईल असा वर प्राप्त झाला. आराध्य महाशक्तीने महादेवाला प्रसन्न होऊन धराधामी अवतीर्ण होऊन पत्नी रूपात जन्म घेईन असे वचन दिले. ही गोष्ट ब्रह्मदेवांना ज्ञात होताच त्यांनी आपले पुत्र प्रजापतींना बोलावून सांगितले की देवी महामाया धराधामी अवतीर्ण होणार आहे. ती तुझी कन्या म्हणून जन्माला यावी अशी इच्छा आहे. ब्रह्मदेवांचा यामागील हेतू जगाचे कल्याण व्हावे हाच होता. पित्याच्या आज्ञेप्रमाणे दक्षाने घोर तप आरंभिले. महामाया त्याच्या तपाने प्रसन्न झाली व तिने दक्षाची प्रार्थना स्वीकारली. त्याप्रमाणे महादेवाची पत्नी होण्यापूर्वी महामाया दक्षपत्नी प्रसूतीची कन्या म्हणून जन्माला आली. परंतु, तत्पूर्वी तिने दक्षाला एक अट घातली. ती अशी की काही कारणाने दक्षाचे पुण्य क्षीण झाले अथवा एखादे प्रसंगी ती दक्षाकडून अपमानित झाली, तर त्याच क्षणी ती देहत्याग करेल.
दक्ष प्रजापती व प्रसूतीची ही कन्या अपरूप सुंदर होती. तिचे ‘सती’ असे नाव ठेवण्यात आले. सती बालपणापासूनच शिवभक्त होती. सदैव शिवाची पूजा-अर्चा करण्यात ती मग्न असे. यथासमय ती विवाहयोग्य झाली. तेव्हा दक्षाने तिच्या स्वयंवराचे आयोजन केले. सतीने जन्मापासूनच महादेवाला मनोमन पती म्हणून वरले होते आणि दक्षाला तिने घातलेल्या अटीचे स्मरण होते. परंतु, पितृप्रेम आडवे आले. त्यामुळे आपल्या लाडक्या सुंदर सुलक्षणी लेकीला स्मशानवासी दरिद्री शिवाला अर्पण करण्याची कल्पनाच त्याला सहन होईना. म्हणून महादेव वगळता विश्‍वातील समस्त राजे लोकांना स्वयंवराचे निमंत्रण देण्यात आले. अखेर व्हायचे तेच झाले. निमंत्रण नसूनही महादेव स्वयंवर स्थळी येऊन उपस्थित झाले. कारण आपली पत्नी होण्यासाठीच स्वयं महाशक्ती पृथ्वीतलावर अवतीर्ण झालेली आहे, हे ते जाणून होते. सतीने पित्याची योजना सफल होऊ दिली नाही. पृथ्वीवरील समस्त निमंत्रितांकडे दुर्लक्ष करून तिने महादेवांना वरमाला अर्पण केली व ती तत्काळ महादेवासह कैलासावर निघून गेली.
दक्षाला हा अपमान सहन झाला नाही. झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने एक महायज्ञ करण्याचे ठरविले. आपल्या कन्या- जामाताला वगळून संपूर्ण त्रैलोक्यातील अतिथींना निमंत्रित केले. इकडे नारद कैलासावर जाऊन पोहोचले व त्यांनी दक्षाने आयोजिलेल्या महायज्ञाची बातमी सतीला सांगितली. सती पित्याकडे जाण्यास निघाली. त्रिकालज्ञ शिवाला भविष्यातील घटना ज्ञात झाली व त्याने सतीची खूप समजूत घालून तिला पित्याकडे जाऊ नये, असा प्रयत्न केला. परंतु व्यर्थ. सतीला पतीचे म्हणणे अजिबात पटले नाही. उलट ती अत्यंत क्रूद्ध झाली. आपले मूळ स्वरूपाचे महादेवाला विस्मरण झाले आहे, असे वाटून ती अपमानित झाली व तिने आपले भयंकर कालिस्वरूप प्रकट केले. तिचे ते रौद्र रूप पाहून स्वयं महादेव अतिशय घाबरले व पळत सुटले. त्यांची ती दयनीय अवस्था पाहून सतीला त्यांची दया आली व शिवशंकराला अडविण्यासाठी ती दाही दिशांना दहा विभिन्न रूपे धारण करून उभी ठाकली. महादेव जिकडे जात त्या दिशेला एक अतिभव्य, भयंकर देवीमूर्ती उभी असलेली त्यांना दिसू लागली. त्यामुळे जाण्याचे सर्व मार्ग अडविल्याने ते आपल्या पूर्वीच्या स्थानी आले. पाहतात तो इथेही एक सर्वग्रासी संहारकारिणी कालिमूर्ती उभी होती. थकून गेलेल्या शिवाने विचारले कोण तू? माझी प्राणप्रिय पत्नी कुठे आहे? तेव्हा हसतच त्या मूर्तीने उत्तर दिले, ‘मीच आहे तुमची सती. तुमची पत्नी होण्यासाठी मी गौरवर्ण धारण केला होता. मी म्हणजे संहारकारिणी कालिका आहे आणि दशदिशांना ज्या देवीमूर्ती तुम्ही आता बघितल्या, त्या सर्व माझीच रूपे होत. देवा, शंकरा! भिऊ नका. मीच सर्व शक्तीचा आधार आहे. तुमची इच्छा असेल तर मी व माझ्या या दहा शक्ती मिळून दक्षाच्या यज्ञाचा याच क्षणी विध्वंस करू शकतो. एवढे बोलून तिने पुन्हा आपले सतीचे रूप धारण केले. महादेव म्हणाले, देवी क्षमा कर. मी तुझे खरे स्वरूप विसरलो होतो. परंतु हे सती, तू सर्वस्वरूपिणी आहेस. परमाप्रकृती-परमेश्‍वरी आहेस. आता तुझी इच्छा असेल तसे करावे.
अशा प्रकारे त्यावेळी दशादिशांना प्रकट झालेल्या दशमहाविद्यांचे वर्णन काही ग्रंथांमध्ये आढळते.
१) देवी कालिकाः तंत्रसार ग्रंथानुसार कालिका चतुर्भुजा असून मुखकेशी आहे. तिचे मुख मेघाप्रमाणे कृष्णवर्णी व भयदायक आहे. गळ्यात मुंडमाळ धारण केलेल्या असून डाव्या हातांमध्ये खड्‌ग व नरमुंड आहेत. तर उजवीकडील हात अभयमुद्रा व वरमुद्रा दर्शवितात. हातातील खड्‌ग अज्ञान निवारणाचे प्रतीक असून छिन्न मस्तक जिवांच्या अहंकाराचे प्रतीक आहे. तिचे त्रिनेत्र सूर्याप्रमाणे तेजस्वी असून ओठांवर रक्तबिंदू असले तरी मुखावर हास्य आहे. दुर्जनांचा संहार करून मर्त्य जिवांना अभय प्रदान करणारी अशी ही कालिका देवी आहे.
२) देवी ताराः तारा निद्रिस्त शिवाच्या हृदयावर पाय ठेवून उभी आहे. कारण ती शक्तिरूपिणी आहे. वर्ण निळा असून लालभडक जीभ बाहेर लोंबत आहेत. तिचे आसन म्हणजे जळणारी चिता जे ज्ञानाग्नीचे प्रतीक आहे. चार हातांमध्ये खड्‌ग, परशू, कमळ व नरमुंड आहे. तिने मस्तकावर पाच मानवी कवट्या धारण केलेल्या आहेत. ज्या शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध या तन्मात्रांचे प्रतीक होत. तिने अंगावर धारण केलेले सर्पालंकार वैराग्याचे प्रतीक आहेत. जगताला भवसागरातून पार करून नेणारी म्हणून हिचे नाव तारा आहे.
३) देवी षोडशीः अत्यंत तेजस्वी गौरवर्णाची सौंदर्यवती षोडशी स्मितहास्य करीत आहे. त्रिनयना असून केशकलाप मुक्त आहेत. चारी हातांमध्ये अंकुश, धनुष्य बाण व बंधनास्त्र आहेत. ललिता -श्रीविद्या राजराजेश्‍वरी अशा नावांनी सुद्धा संबोधिली जाते. तिचा गौरवर्ण ज्ञानशक्तीचे प्रतीक आहे. ती पंचासनावर बसलेली आहे. पंचज्ञानेन्द्रिय, पंचकर्मेन्द्रिय, पंचमहाभूत आणि मन या सोळांची कारणस्वरूप म्हणून ती षोडशी नावाने प्रसिद्ध आहे.
४) देवी भुवनेश्‍वरीः भुवनेश्‍वरी देवी उगवत्या सूर्याप्रमाणे ज्योतिर्मय असून तिच्या कपाळावर अर्धचंद्र विराजमान आहे. मस्तकावर मुकुट असून त्रिनयनी असलेल्या या देवीच्या मुखावर प्रसन्न हास्य आहे. चार भुजांमध्ये अंकुश-पाश-वरमुद्रा व अभयमुद्रा दर्शवितात. रत्नसिंहासनांवर बसलेली असून एक पाय कमळावर, तर दुसरा मांडीवर आहे. तिचा ज्योतिर्मय वर्ण तेजाचे प्रतीक असून तो बुद्धीची जडता व अहंकार नष्ट करतो. त्यामुळे साधकाची साधना उन्नत होऊन त्याला ब्रह्मज्योतीचे दर्शन घडते. हातातील अंकुश संयमाचे प्रतीक असून मनरूपी उद्दाम हत्तीवर ती अंकुशाने प्रहार करते. साधकांच्या इंद्रियवृत्तींना बंधन असावे म्हणून एका हाती पाश धारण केलेला आहे. तिची वराभयमुद्रा मातेचा स्नेह दर्शविते.
५) देवी भैरवीः देवी भैरवीची मूर्ती फार अद्भुत असते. ती एकाच वेळी शांत व रौद्र, कठोर व कोमल असे तिचे स्वरूप आहे. ती काल भैरवाची पत्नी म्हणून भैरवी. सहस्रसूर्याच्या तेजाप्रमाणे ती तेजस्वी असून लाल रंगाचे वस्त्र परिधान करते. गळ्यात नरमुंडमाळा असून चतुर्भुजा आहे. पैकी दोन हातांमध्ये पुस्तक व जपमाळ आहेत. तर दोन हात अभय आणि वर देणारे आहेत. मुखकमल पुष्पाप्रमाणे सुंदर असून रक्तवर्णा आहे. तिचे लाल वस्त्र वासनांचे प्रतीक आहे. भैरवी समस्त जिवांना बीजरूपाने प्रथम आपल्या गर्भात धारण करते व नंतर स्वतःच्या तप व इच्छाशक्तीच्या बळाने ज्ञानाचे प्रतीक होत. देवी भैरवी सृष्टी स्थिती लयाचा आधार आहे.
६) देवी छिन्नमस्ताः एकदा देवी पार्वतीच्या दोघी सख्या, डाकिणी व वर्णिनींना खूप भूक लागली. त्यांनी व्याकुळ होऊन देवी जगन्मातेला त्यासाठी विनविले तेव्हा देवीने आपले मस्तक छिन्न करून डाव्या हातात धरले आणि त्यामुळे तिच्या कंठातून रक्ताच्या तीन धारा वाहू लागल्या. उजवीकडील धार डाकिणी पिऊ लागली, तर समोरील धार वर्णिनी पिऊ लागली. मधली धार देवीने हाती धरलेल्या स्वमुखात पडू लागली. त्यानंतर देवी पुन्हा पूर्ववत झाली. मस्तक छिन्न केल्याने नाव पडले छिन्नमस्ता. अशी ही देवी महातेजस्वी असून चतुर्भुजा आहे. गळ्यात मुंडमाळा धारण केलेल्या असून तिच्या कंठातून निघालेली रक्ताची धार स्वतःच पिते याचा अर्थ देवी स्वयं भोक्ता भोग्य आणि भोग होय. कंठातून निघालेली रुधिर धारा सात्त्विक राजसिक व तामसिक भोगांचे प्रतिरूप होय. दोघी सख्यांपैकी डाकिणी ज्ञानमयी विद्याशक्ती तर वर्णिनी तमोमयी अविद्याशक्ती होत.
७) देवी धूमावतीः धूमावती धुराने वेढलेल्या अग्निशिखेप्रमाणे रहस्यमय असून ती प्रकाश अथवा अप्रकाशही नाही. दक्ष प्रजापतींच्या यज्ञात सतीने उडी घेऊन स्वतःची आहुती दिली, त्यावेळी यज्ञस्थळी जो धूर निर्माण झाला त्यातून धूमावतीचा जन्म झाला. अत्यंत रूक्ष शरीर असून मुख विशाल आहे. ही करालमुखी सदैव तहान-भुकेने व्याकुळ असून भयप्रद व कलहप्रिय आहे. ती कृष्णवर्णी-चंचल आहे. मलिन वस्त्र धारण केले असून केशकलाप रूक्ष आहे. देवीचे हात सर्पाप्रमाणे व डोळे रूक्ष आहेत. एकदा देवी पार्वती तहानेने अत्यंत व्याकुळ झाली असता तिने स्वयं महादेवाला पिऊन टाकले. तेव्हा तिच्या सर्वांगातून धुराचे लोट निघू लागले. शिवाने स्वमायेने पुन्हा पूर्ववत शरीर धारण केले व ते पार्वतीला म्हणाले, ‘प्रत्येक पुरुष शिव व प्रत्येक स्त्री पार्वती असते.’ परंतु पार्वतीने शिवाला भक्षण केल्याने ती विधवा झाली आहे. भोगाच्या कामनेने विवेक नष्ट होतो. विषयान्ध जिवाची देहासक्तीचे प्रतीक म्हणून तिचे नेत्र रूक्ष आहे व तिचे मलिन वस्त्र व केशकलाप तसेच तिच्या रथावरील ध्वजचिन्ह कावळे इत्यादी मृत्यूचे निदर्शक होत. शरीराची भोगेच्छा जिवाला बद्ध करते. जन्म-मृत्यूच्या चक्रातून जिवाला मुक्त करण्यासाठी देवी धूमावतीने आपल्या ओंगळ रूपातून दाखवून दिले आहे की असे ओंगळ नसावे.
८) देवी बगलामुखीः या देवीचे रूप गंभीर व रौद्र आहे. वर्ण तप्त सुवर्णाप्रमाणे आहे. ती चतुर्भुजा असून कमळासनावर बसलेली आहे. त्रिनयना असलेल्या बगला देवीच्या हातात मुद्गल पाश आहेत. एका हाताने तिने शत्रूची जीभ ओढून धरली आहे. शरीराप्रमाणेच पिवळेजर्द वस्त्र परिधान केले आहे. जे तमोगुणाचे आवरण दूर करून रजोयुक्त सत्त्वगुणाचे प्राबल्य दर्शविते. तिच्या हातातील मुद्गल मोहमुदग्ल असून मोहरूपी विष नष्ट करण्याचे निदर्शक आहे. शत्रूची जिव्हा ओढते म्हणजेच जिव्हारूपी शत्रूचे हनन करते. जिभेने माणूस रसाचे सेवन करतो व साधनेत विघ्न येते. त्याचप्रमाणे कटु शब्दांचा प्रयोग करून हीच जिव्हा जिवाची अधोगती करते.
९) देवी मातंगीः पुराणकाळी मातंग ऋषींनी कदंब वनातील सर्व वृक्ष व प्राण्यांना वश करण्यासाठी अनेक वर्षे घोर तप केले होते. त्यावेळी प्रसन्न होऊन देवी मातंगी प्रकट झाली होती. मातंगी चतुर्भुजा, त्रिनयना असून वस्त्रालंकारांनी सजलेली आहे. रत्नसिंहासनी बसलेली मातंगी देवीच्या हातांमध्ये अंकुश, तलवार, पाश व खडग आहेत. ही अस्त्र-शस्त्रे साधकाच्या चंचल चित्तवृत्तींवर आघात करून त्याला सावध करतात. तिच्या मस्तकावरील अर्धचंद्र अमृत रसाचे वर्णन करतो व साधकाचा रजोगुणी अहंकार नष्ट करतो. तिचे त्रिनयन चंद्र, सूर्य व अग्नीचे प्रतीक होत. सत्त्व-रज-तम या विविध अहंकारांपैकी राजसिक अहंकारातून मनस्तत्वाची निर्मिती होते. देवी तिच्या दैवी आकर्षणाने साधकाच्या राजसिक अहंकारचे शोषण करते म्हणून ती श्यामवर्णी आहे. या देवीची साधना करणारा साधक मेधावी होऊन चौसष्ट कलांमध्ये निपुण होतो.
१०) देवी कमलाः कमलासनावर प्रतिष्ठित कमलादेवी सुवर्णवर्णा असून तिच्या चहू दिशांना सोंडेवर सुवर्णकलश घेतलेले चार हत्ती आहेत. चारी हत्ती कलशातून देवीवर अभिषेक करीत आहेत. देवीच्या डाव्या हाती कमळ असून उजवा हात अभयमुद्रा दर्शवितो. मस्तकावर रत्नजडित मुकुट असून तिने भरजरी वस्त्र परिधान केलेले आहे. देवीची तेजस्वी सुवर्णकांती विशुद्ध ज्ञानाचे प्रतीक होय. देवी त्रिगुणात्मिका असून सारा जगतप्रपंच व्यापून आहे. चार हत्ती अर्थमयी-शब्दमयी-चक्रमयी व देहमयी सृष्टीशक्तीचे परिणामस्वरूप होत. ‘क’ चा अर्थ भोग सुख असा आहे. म्हणून तिच्या हातातील दोन कमळं ऐहिक व पारमार्थिक भोगाचे प्रतीक होत. साधकाला साधनेच्या उत्तुंग अवस्थेत ऐहिक भोग सुख तुच्छ वाटू लागते. याचे प्रतीक म्हणून कमळ. पूर्ण उमललेले कमळ षट्‌चक्रांचे निदर्शक होय. तिचे भरजरी वस्त्र म्हणजे तिने स्वतःचे तेज लपवून ठेवण्याचे निदर्शक असून त्याद्वारे ती आपले मोक्षदायी स्वरूप लपवून ठेवून जिवाला मायेच्या बंधनात बांधून ठेवते.
अशाप्रकारे या दशमहाविद्यांचे वर्णन तन्त्रात वर्णन केलेले आढळते. थोडक्यात सांगायचे झाल्यास देवी काली व तारा साधकाची अंतर व बाह्य श्रवणशक्ती विकसित करतात. देवी षोडशी व भुवनेश्‍वरी आमची अंतर-बाह्य दर्शनशक्ती विकसित करतात. परंतु त्यासाठी आवश्यक तीन मार्ग म्हणजे वायू-जल व स्थळ ज्यांचे रक्षण करतात देवी धूमावती-मातंगी-बगला-भैरवी आणि कमला-छिन्नमस्ता, म्हणूनच या दशमहाविद्या होत. या सर्वांच्या कृपेनेच साधक परार्थविद्या व सर्वार्थसिद्धींचा लाभ करून घेतो.
या देवि सर्वभूतेषू शक्तिरूपेण संस्थिता|
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥

ज्योतिष्याचार्य
डॉ.सुहास रोकडे
www.astrotechlab.weebly.com

No comments:

Featured Post

Read Google books-Astrologer Dr.Suhas

www.astrotechlab.weeebly.com >